पुणे : कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. राज्यातील वादळी सत्तांतरानंतर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लढली गेलेली ही पहिलीच निवडणूक. त्यामुळेच या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. निकाल भाजपच्या दृष्टीने धक्का देणारे तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढविणारे ठरले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसब्यात मतदारांनी भाजपला धडा शिकवला तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे भाजपची लाज राखली गेली व भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. बंडखोरी झाली नसती तर कदाचित येथेही भाजपला पराभवाचा धक्का बसला असता, असे राजकीय जाणकारांना वाटते.
कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने मविआला शह देण्याचा प्रयत्न म्हणून ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला व तो भाजपच्या अंगलट आला. तर दुसरीकडे मविआच्या वतीने काँग्रेसने लोकप्रिय उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन पहिली लढाई जिंकली होती. कसबा मतदारसंघात धंगेकरांची लोकप्रियता भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली. तर दुसरीकडे भाजपचा पारंपरिक ब्राह्मण मतदार मतदानाच्या दिवशी उदासीन भूमिका बाळगून होता. त्यामुळे मोठी ताकद लावूनही भाजपला मतदारांची नाराजी दूर करता आली नाही. स्वतः गिरीश बापट यांना भाजपने प्रचारासाठी मैदानात उतरविले होते. मात्र, त्यातूनही चुकीचा संदेश गेल्याचे दिसत आहे. मतदारांना गृहित धरून निर्णय थोपविण्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा मोठा धडा कसब्याच्या निकालाने भाजपला दिलाय. एकीचे बळ किती महत्वाचे आहे, याचा पुनर्प्रत्यय या निकालाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणून दिलाय. तिकडे चिंचवडमधील विजयाने भाजपची लाज राखली गेली असली तरी हा निकाल भाजपच्या चिंता वाढविणारा आणि महाविकास आघाडीच्या आशा वाढविणारा ठरला आहे. या मतदारसंघात राहुल कलाटे यांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली असे दिसते. अन्यथा येथील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता, असे चित्र मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
कोणासाठी धोक्याची घंटा?
नागपूर पदवीधर, नागपूर शिक्षक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघानंतर आता कसब्यातील पराभव भाजपच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरतो आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी आहे की काय, याची चाचपणी व त्यावर उपाय करणे भाजपसाठी आता अपरिहार्य झाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असे भविष्याचे संकेत दिसत आहेत.
कसबा, चिंचवडमधील पोटनिवडणूक निकालाचा नेमका अर्थ कार्य?
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा