चिंचवडमध्ये त्रिकोणी लढतीने भाजपच्या अश्विनी जगताप यांना तारले

0

पुणेः चिंचवड विधानसभा मतदारसंघात अखेर त्रिकोणी लढतीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी बाजी मारली. जगताप यांनी ३६ हजारांच्या मताधिक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले (Chinchwad Assembly Constituency) . कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला फटका व भाजपला फायदा झाल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप या आघाडी घेऊन होत्या. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना एकूण 1 लाख 35 हजार 603 मते तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली.
भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना रिंगणात उतरविले होते. तर महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी लढविली. मात्र, काटे यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली व ती बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. कसबा मतदारसंघात भाजपला धक्का बसला असताना चिंचवडच्या विजयाने भाजपची लाज राखल्याचे मानले जात आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झाले होते.