कसबापेठ, पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर

0

मुंबई


भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे विधानसभेच्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने बुधवारी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर निवडणुक बिनविरोध होणार का, याकडे लक्ष लागलेले आहे. या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही, अशी प्रथा परंपरा महाराष्ट्रात पाळली जात आहे. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.

तीन राज्यांच्या निवडणुका

दरम्यान, निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांसाठीदेखील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार त्रिपुरा राज्यात येत्या १६ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा