केरला स्टोरी आणि पुरोगामीत्व

0

-शैलेंद्र कवाडे.

केरला स्टोरी हा एक सिनेमा आहे आणि तो कोणत्याही सिनेमा इतकाच चांगला-वाईट खरा-खोटा आहे.

काहींच्या मते तो समाजातील एका मोठ्या घटकाला जागे करण्यासाठी तयार केलाय तर काहींच्या मते तो समाजात फूट पाडण्यासाठी निर्माण केलाय,

माझ्या मते निर्मात्याला ही कथा आवडल्याने आणि ह्या विषयात व्यावसायिक यश मिळेल असे वाटल्याने त्याने ही जोखीम घेऊन सिनेमा तयार केला.

जगातले बहुतांश सिनेमे असेच आणि ह्याच कारणाने तयार होतात.

प्रश्न तो नाही,

प्रश्न हा आहे की हा चित्रपट आवडणे-न आवडणे, पटणे- न पटणे ह्या गोष्टींकडे आपण वैयक्तिक चॉईस म्हणून बघणार आहोत की त्याला एका झुंडीचा भाग म्हणून बघणार आहोत?

आज इथे अनेक पोस्ट वाचल्या ज्यात ह्या एका सिनेमाला अनेक गोष्टींशी जोडले होते. कालपरवापर्यंत कला ही समाजाचा आरसा असते म्हणणारे आज ह्या प्रतिबिंबाला नाकारत होते, काहींच्या मते 2014 मध्ये भारताच्या भूमीखालील टॅक्टोनिक प्लेट्समध्ये काहीतरी हालचाल होऊन एकाएकी समाजात दुफळी निर्माण झाली, काहींच्या मते आपण आपल्या मुलींना अनावश्यक सूट दिल्याने हे प्रॉब्लेम होत आहेत, काहींना वाटतंय आपण आपल्या धर्मापासून दूर गेल्याने हा त्रास आहे.

खरंतर सत्य ह्याच्या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी आहे.

भारतीय समाजात धर्मावरून असलेल्या दुफळीला कमीत कमी हजार वर्षांचा इतिहास आहे. ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी अल बेरुणीच्या तारीख अल हिंद पासून सुरवात करून बाबासाहेबांच्या पार्टिशन ऑफ इंडिया पर्यंत वाचन करावे. त्या काळात ना भाजप होती ना RSS, पण हिंदूंना असणारी मुस्लिमांची साधार भीती आणि मुस्लिमांना असलेली सगळ्या हिंदूंना धर्मांतरित करण्याची आस, तेंव्हाही होती.

हिंदू मुस्लिम प्रश्नाची खरी मेख ही धर्मांतराची आस आहे. धर्मांतराची इच्छा किंवा तथाकथित अधिकार बाजूला ठेवल्यास ही फूट लगेच बुजून जाईल, पण हे करण्याची ना मुस्लिमांची तयारी आहे ना त्यांनी हे करावे हे सांगण्याचे धाडस तथाकथित लिबरल लोकांमध्ये आहे.

धर्म हा खरंतर सामान्य हिंदूंच्या रोजच्या आयुष्याचा एक छोटा भाग आहे. हिंदू ही मूलतः एक वैयक्तिक जीवनपद्धती आहे तर इस्लाम ही राजकीय महत्वाकांक्षा असलेली आणि त्यासाठी देव व धार्मिक श्रद्धा वापरून घेणारी व्यवस्था आहे.

इस्लाम जेंव्हा कट्टर होतो तेंव्हा त्याचा पहिला बळी हा त्याच्या आजूबाजूचा गैर इस्लामी माणूस असतो. एकदा असे गैर इस्लामी लोक संपले की इस्लाम स्वतःमध्ये असलेले कमअस्सल लोक शोधतो, मग ते कधी अहमदिया असतात तर कधी शिया.

हिंदूंचे मात्र वेगळे आहे. कट्टर धार्मिक हिंदुत्व ही स्वतःचीच पिल्लं खाणारी मांजर आहे. हिंदू कट्टर होतो तेंव्हा आधी स्वतःच्याच लोकांवर बंधन घालतो, स्वतःच्याच लोकांना दूर लोटतो, पोकळ तत्वांची चर्चा करत स्वतःच्याच समुदायात फूट पाडतो. कट्टर झालेले धार्मीक हिंदुत्व हा हिंदूंचा सगळ्यात मोठा शत्रू ठरतो.

कट्टरतेतील हा भेद समजून घेतल्याशिवाय केरला स्टोरी, त्यातला संदेश, त्यातले धोके आणि त्यावरचे उपाय समजून घेता येणार नाहीत.

अनेकांनी केरला स्टोरीला पुरोगामीत्वाशी जोडले आहे. त्यांच्या मते हिंदूंच्या अंतर्गत धार्मिक सुधारणा जास्त महत्वाच्या आहेत आणि आंतरधर्मीय विवाह ही दुय्यम गोष्ट आहे. खरंतर धार्मिक आणि सामाजिक दोन्ही सुधारणा हिंदूंनी केल्या आणि त्या ह्यापुढेही सुरूच राहतील हे त्यांनाही माहीत आहे. एखादा माणूस राजकीय दृष्ट्या हिंदूत्ववादी असतो पण वैयक्तिक आयुष्यात अनेकदा नास्तिक असू शकतो. अनेक हिंदुत्ववादी सामाजिकदृष्ट्या अत्यंत सुधारित विचारांचे असतात. राजकीय हिंदुत्वाला पाठिंबा दिला म्हणजे ते सगळ्या सामाजिक सुधारणांवर बोळा फिरवणार नसतात.

माझ्या मते ह्या दोन पॅरलल गोष्टी आहेत.

ह्या चित्रपटात चर्चिलेली गोष्ट ही इस्लामसाठी धार्मिक गरज असेल पण हिंदूंसाठी ती एक राजकीय समस्या आहे. दररोज पूजा केल्याने, व्रतवैकल्ये केल्याने, किंवा मुलामुलींकडून स्तोत्र पठण करून घेतल्याने ही समस्या दूर होणार नाही.

खरंतर हिंदू धर्मापेक्षा आपल्या मुलांना इस्लाम म्हणजे काय हे नीट कळले तर कदाचित त्यांना ही परिस्थिती जास्त चांगली हाताळता येईल.

हिंदूंचा आक्षेप हा नाही की त्यांच्या मुलींचे मुस्लिम मुलांशी प्रेमविवाह होतात, हिंदूंचा आक्षेप हा आहे की हे विवाह एक स्ट्रॅटेजी म्हणून केले जातात, त्यामागे सरळ प्रलोभन स्वतःची संख्या वाढवणे व त्याद्वारे राजकीय सत्ता काबीज करणे हे असते. त्याच वेळी स्वतःच्या मुलींना मुस्लिम बुरख्यात राहण्याची सक्ती करतात, शक्यतो मोकळ्या समाजात वावरू देत नाहीत. मुस्लिम मुलीशी प्रेमविवाह झाल्यास एकतर मुलाला मुस्लिम व्हावे लागते किंवा मुलीच्या कुटुंबाकडून हिंसक धमक्यांना सामोरे जावे लागते असे सामान्य निरीक्षण आहे.

हिंदूंचे आक्षेप ह्या असमान वागण्याला आहे. मुस्लिम आणि त्यांच्यामागे आंधळेपणाने उभे राहिलेले छद्मी पुरोगामी जोपर्यंत हे समजून घेणार नाहीत तोपर्यंत केरला स्टोरीसारखे चित्रपट तयार होणार आणि धो धो चालणार, एकदा हे चित्र बदलले की हे प्रतिबिंबही बदलेल..

तोपर्यंत प्लिज सहन करा..