खामगाव- नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजत नगरी खामगावच्या इतिहासात नवे सुवर्ण पान जोडल्या गेले आहे. आज दुपारी अवकाशात झेपावलेल्या चंद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमुल्य वाटा आहे. या चंद्रयानात खामगाव एमआयडीसी मधील विकमसी फेब्रीकेशनचे थर्मल शिल्ड आणि श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या आहेत. ही खूप मोठी उपलब्धी असून यामुळे खामगावची देशात नवी ओळख निर्माण झाली आहे. भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान- ३ मोहीम आज पासून सुरु झाली असून अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांन श्रीहरीकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रावरुन चंद्रयान- ३ अवकाशात झेपावले. हे चंद्रयान बनविण्यासाठी असंख्य शास्त्रज्ञांची प्रचंड मेहनत लागलेली असून या चंद्रयानाच्या निर्मितीत खामगावचे मोलाचे योगदान आहे. देशभरात प्रसिध्द असलेल्या खामगाव एमआयडीसी मधील विकमस फेब्रीकेशनचे थर्मल शिल्ड या चंद्रयानात वापरण्यात आले आहेत. हे शिल्ड बनविण्यासाठी प्रचंड मेहनत लागली असून खामगावातील वस्तु चंद्रयाना वापरल्या जाणे ही खूप मोठी व उपलब्धी म्हणावी लागेल. याचप्रमाणे या चंद्रयानात खामगाव एमआयडीसीमधील विख्यात श्रध्दा रिफायनरीकडून बनविण्यात आलेल्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या आहेत. यामध्ये ९० टक्के चांदी आणी १० टक्के कॉपर असते. या आधी या सिल्व्हर स्टलिंग ट्युब विदेशातून मागविण्यात येत होत्या. मात्र, आता खामगावातील श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात येतात अशी माहिती श्रध्दा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली.














