
खासदार ज्येष्ठ नागरिक महोत्सवाचा दुसरा दिवस
नागपूर, 20 जानेवारी
मराठी, हिंदी भाषेतील नवी-जुनी गाणी आपल्या अनोख्या इंडो-वेस्टर्न शैलीने एका सुरात सादर करीत ‘कोकण कन्यां’ या सहा युवतींच्या बँडने ज्येष्ठांची दाद मिळवली. सुरेश भट सभागृहात मोठ्या संख्येने जमलेल्या ज्येष्ठांनी या सुरेल बँडचा आनंद घेतला.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने खासदार ज्येष्ठ नागरिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. आज शनिवारी झालेल्या दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, व्यावसायिक घनश्याम कुकरेजा, प्रा. संजय भेंडे, अरविंद टेंभुर्णीकर, सुनंदाताई हरणे या ज्येष्ठांचा ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, कोंकण बँडचे कलाकार व तंत्रज्ञ अरुंधती तेंडुलकर, मधुरा परांजपे, वेदा नेरुरकर, दिप्ती रेगे, संचिता प्रधान, जुई भागवत, रविराज विजय कोलथलकर, दीपक जैन यांचाही त्यांनी सत्कार केला.
कोकण कन्या बँड हा इंडो-वेस्टर्न टच असलेल्या शैलीचा बँड असून या ६ अष्टपैलू महिला गायिका बॉलीवूड चित्रपटातील गाण्यांचे पाश्चात्य संगीतातील रॅप, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील आलाप आणि त्यांचे स्वर यांचे अनोखे मिश्रण करून सादर करतात. या गायिकांनी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामगीत सादर करून प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत कार्यक्रमाला प्रांरभ झाला. त्यानंतर त्यांनी फिल्मी सुफी गीतांची मेडले सादर केली. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांनी मेरी आवाज ही पहचान, तु जहां जहां चलेगा, तेरे बिना जिंदगी में सारखी गीते सादर करून स्वरांजली वाहिली व ज्येष्ठांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी अभिनेते अमोल पालेकर यांच्यावर चित्रित झालेली जब दिप जले आना, तु जो मेरे सूर में, गोरी तेरा गाव बडा प्यारा, उठे सबके कदम, आनेवाला पल जानेवाला है आदी गीते सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव राजू मिश्रा, कोषाध्यक्ष अशोक मानकर, विश्वस्त प्रभाकर येवले, प्रतापसिंह चव्हाण, गोपाल बोहरे, नारायण समर्थ, बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, डॉ. संजय उगेमुगे, गौरी चांद्रायण, महमूद अंसारी, निलेश खांडेकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
ज्येष्ठांच्या आनंदासाठी महोत्सव – ना. नितीन गडकरी
ज्येष्ठ नागरिकांना आनंद मिळावा, त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता यावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ज्येष्ठांसाठी आरोग्य चिकित्सा, चष्मे वाटप आदी आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातात. आंभोरा, आदासा आदी स्थळांच्या धार्मिक पर्यटन सहलीसाठी ज्येष्ठांना बस उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.