निधीच्या खिरापतीवरून शिंदे गटात कुरापती!

0

संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरियांवर गंभीर आरोप : अकोल्यात शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर

अकोला. जिल्ह्यात (Akola district ) शिंदे गटात (Shinde group ) अंतर्गत कलह विकोपाला गेल्याचे चित्र आहे. निधीवरूनच शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Former MLA Gopikishan Bajoria ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बाजोरियांची लेखी तक्रार जाधव यांच्याकडे केली आहे. बाजोरियांच्या तक्रारीत ‘कमिशन एजंट’ असा गंभीर उल्लेख करण्यात आला. आधी मिळालेले 15 कोटी आणि त्यानंतर मिळालेले 20 कोटींच्या वाटपावरून बाजोरिया आणि नाराज गटात भांडण सुरू असून अकोल्यात शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
राज्यात जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातकडून अकोला जिल्ह्यात राजकीय पेरणी झाली होती. शिवसेनेच्या 26 पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला होता. आगामी महापालिका, नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार निधी मिळाला पण, याच निधीच्या वाटपावरून वादाची ठिणगी पडली आहे.
विकासनिधी विकल्याचा आरोप
शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्यावर विकास निधीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी पत्रात केला आहे. मिळालेला विकासनिधी कमिशन घेऊन ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द करण्यात आली. त्यांची पडीक मालमत्ता लोकांनी विकत घ्यावी यासाठी विकासनिधी वापरल्याचा आरोप पत्रात केला आहे. बाजोरियांच्या प्रकल्पांमध्ये नाल्यांची कामे टाकण्यात आली. याची भनकही पदाधिकाऱ्यांना लागू दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व प्रकार बाजोरीया यांच्यामार्फत सुरू असून ते स्वार्थासाठी कोणत्या थराला गेले आहेत, हे लक्षात येते असेही तक्रारीत म्हटले आहे. विकास निधीची मलाई खाण्यातच बाजोरिया गुंग असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा