नवे राज्यपाल बैस यांच्या कारकिर्दीलाही वादाची लकेर!

0

झारखंडमध्ये सरकारसोबत संघर्ष

मुंबई. वादग्रस्त विधानांमुळे कायम वादात राहिलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, कोश्यारी यांच्या प्रमाणेच रमेश बैस यांच्या राज्यपाल पदाच्या कारकिर्दीलाही वादाची लकेर राहिली आहे. रमेश बैस यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले होते. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला. मागील वर्षी राज्यपाल बैस यांना न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बैस यांच्याद बाचाबाची झाली होती.
रमेश बैस 7 वेळा खासदार राहिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. यानंतरही 2019 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करीत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.

झारखंडच्या स्थापना दिन सोहळ्याला अनुपस्थिती

झारखंडमधीर सत्ताधारी व राज्यपालांमधील संघर्ष राज्याच्या 22 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात प्रकर्षाने अधोरेखित झाला होता. राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे असतानाही, त्यांनी सोहळ्यात जाणे टाळले होते. झारखंडच्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात राज्यपालांच्या गैरहजेरीची इतिहासात ही पहिलीच वेळ ठरली.

राजकीय बॉम्बची चर्चा!

दिवाळी दरम्यान खाजगी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी दिल्लीत फटाक्यांना बंदी आहे, पण झारखंडमध्ये कधीही अणू बॉम्ब फुटू शकतो, असा राजकीय बॉम्ब त्यांनी फोडला होता. त्याचवेळी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांचे हे विधान झारखंडच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राज्यपाल बैस यांच्यावर अनेक आरोप केले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा