राष्ट्रपतींनी स्वीकारला कोश्यारींचा राजीनामा
नवी दिल्ली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Dropadi Murmu) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्याचवेळी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली सुद्धा केली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैंस (Ramesh Bais) यांची नियक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त विधानांमुळे भगतसिंग कोश्यारी नेहमीच चर्चेत राहिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोश्यारींकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अनेक वेळा सरकारकडून करण्यात आली होती. सत्तांतरणानंतर तर विरोधकांनी त्यांच्या विरोधात रानच उठविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळणार असल्याची चर्चा होती. वेगवेगळी नावेसुद्धा चर्चेला आली. राष्ट्रपती मुर्मू यांनी रमेश बैंस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बैंस यांची नियुक्ती केली आहे.
सलग ७ वेळा खासदार
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. बैस यांचा जन्म त्यावेळच्या मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.
टीकासत्र सुरूच
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर विरोधाकांनी टीकेची झोळ उठविली होती. जवळपास त्यांचा संपूर्ण कालखंडच वादात राहिला. त्यांचा राजिनामा स्वीकरल्यानंतर महाराष्ट्रातून निघून जाणार असल्याचे निश्चित असतानाही विरोधाकांनी टीका कायम ठेवली आहे. ऐवढेच नाही तर कोश्यारींवर सुरू असलेल्या टीकेची री जोडूनच नव्या राज्यपालांवरही उपरोधिक भाषेत टीका केली जात आहे. यामुळे रमेश बैंस यांच्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपालपद आव्हानात्मक ठरणार आहे.