“माझ्या मुलाला सोडा, त्याला जेलमध्ये ठेवू नका हो..”..

0

 

 

मुंबई : सीबीआयकडून आपल्याविरुद्ध सुरु असलेल्या कारवाईवरून एनसीबीचे पूर्व मुंबईचे माजी क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिकेतून मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे यांनी त्यांची व अभिनेता शाहरूख खान यांच्यात ३ ऑक्टोबर २०२१ रोजी व्हॉट्सअॅपवर झालेल्या खासगी संभाषणाची स्क्रिप्ट याचिकेसोबत जोडली आहे. या संभाषणात शाहरूख खान हा वानखेडे यांना आर्यनला सोडविण्याची वारंवार विनंती करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात त्याने आपल्या मुलाचा साधेपणा वारंवार स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
वानखेडे यांच्यावर शाहरूख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्याबद्धल सीबीआयकडून सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केली आहे. वानखेडे यांनी म्हटले आहे की, शाहरूख खान हे आर्यन खानला सोडण्याची वारंवार विनंती करीत होते. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपवर दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची माहिती सादर केली आहे. या प्रकरणात दोघांमध्ये अनेकदा संभाषण झाले आहे.
शाहरूख खान याने वानखेडे यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटले आहे की, “मी तुमच्याकडे याचना करतो की त्याला जेलमध्ये ठेवू नका. एक व्यक्ती म्हणून तो कोलमडून पडेल. तुम्ही मला आश्वासन दिलेय की माझ्या मुलाला तुम्ही सुधारणार आहात…तुम्ही त्याला अशा ठिकाणी पाठवणार नाही, जेथून तो मानसिकरित्या खच्ची झालेला व्यक्ती म्हणून परतणार..कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा..या घटनेनंतर आर्यनमध्ये असे बदल घडून येतील की त्यावर मला व तुम्हालाही अभिमान वाटेल. ही घटना त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरेल. मी तुम्हाला आश्वासन देतो की हे सुधरण्याच्या दिशेने पाऊल असेल. हा देश प्रामाणिक व मेहनती लोकांकडे बघतो आहे. कृपया थोडी दया दाखवा. मी एक पित्याच्या नात्याने मी तुम्हाला ही याचना करतो आहे…