-कोराडी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरीची घटना
नागपूर :अनैसर्गिक लैगिक संबंधाच्या वादातून एकाचा डोक्यात लोखंडी सळीने वार करीत हत्येची घटना
कोराडी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरी येथे आज घडली . अर्धनग्न अवस्थेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. खापरी येथे शेतकरी नरेश देवरे यांच्याकडे गाई म्हशी चरायचे काम करण्यासाठी असलेला नोकर घनश्याम शिरसाम (वय ४५) असे मृतकाचे नाव असून या घटनेत मुख्य आरोपी खापरी येथीलच संदीप गोंडगे (२२)सह आरोपी म्हणून रवी ढोमणे (२०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार घनश्याम हा मूळचा मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील मोहगाव येथील रहिवासी आहे. तो दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी कामाला होता. मध्यंतरीच्या काळात गावाकडे गेला. पंधरा दिवसापूर्वी पुन्हा तो या ठिकाणी काम करायला आला. आज सकाळी नरेश देवरे यांच्याकडील गाईच्या गोठयासमोर खाटेवर त्याचा मृतदेह आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी संदीप गोंडगे व मृतक घनश्याम सिरसाम यांच्यामध्ये अनैसर्गिक लैंगिक संबंध होते. त्यावरूनच रात्री या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. संदीप गोंडागे यांनी रवी ढोमणेच्या मदतीने हल्ला चढविला. या प्रकरणात आणखीही आरोपी असू शकतात असा पोलिसांना संशय आहे.परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त श्रवण दत्त एस, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.