तुळजापूरः तुळजापूर देवी मंदिराच्या प्रशासनाचा निर्णय वादग्रस्त ठरल्याने अखेर मंदिर प्रशासनाला माघार घ्यावी लागली (Tuljapur Temple Committee Decision) आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या (Dress Code for Devotees) भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतला होता. तसे फलकही लावण्यात आले होते. मात्र, त्या निर्णयावर टीका झाल्याने अखेर प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीच्या नोटीसीचे फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येतात. भाविकांनी दर्शनाला येताना कोणते कपडे परिधान करावेत यासंबंधीचा कोणताही नियम आजतागायत अस्तित्वात नव्हता. पण मंदिर प्रशासनाने बुधवारी एका नोटीसीद्वारे अंगप्रदर्शक कपडे घालून दर्शनासाठी येण्यास मनाई केली. मंदिर प्रशासनाच्या नोटीसनुसार, जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बर्मुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही,’ असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी लगेच सुरु झाली होती. मात्र, टीका होताच प्रशासनाने निर्णय मागे घेतला.