राऊतांच्या वक्तव्यावर पटोलेंनी ठाकरे गटाला दिला इशारा

0

 

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढण्याची तयारी सुरु असून त्यासाठी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु असताच जागांवरुन तीन पक्षांमध्ये वाद सुरु झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आमच्या जिंकलेल्या जागा आम्ही लढविणार असल्याचे वक्तव्य केले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांनी त्यांना आघाडीत अडचण निर्माण करु नका, असा इशारा दिलाय. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही गटांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. अद्यापर जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून चर्चा देखील झालेली नाही. आमच्या तिन्ही पक्षांकडून ३-३ प्रतिनिधींचा समावेश असलेली ९ लोकांची समिती केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

 

 

पटोले म्हणाले की, जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील याची चर्चा व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये अडचण निर्माण करू नये. प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू केली असेल तर यात काहीही वावगे नाही. काँग्रेस देखील आपले काम करत असून आमची चाचपणी सुरू असल्याचे पटोले यांनी अधिक सांगितले

ठाकरे गटाचा दावा

आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, मागील लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहील. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही, असा दावाही राऊतांनी केला होता.