मुंबई – मतभेद असले तरी एकत्र येऊन पर्याय देण्याचे काम विरोधकांनी करावे. कोणाच्याही हातात रिमोट राहू द्या विरोधक एकत्र आले पाहिजे. नेतृत्व कोणाकडे राहू द्या, लोकांनी बदल घेण्याचा निर्णय घेतल्यास बदल होतो. मतदार राजा असतो तो बदल घडवतो. 1977 आणि 2023 देशातील परिस्थिती सारखी आहे. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधांकडे अधिक असायला हवे. राज्यातील निकाल पाहता भाजप विरोधी निकाल आहे.
बहुतांश राज्यात सत्ता भाजपची नाही. मोजक्या राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते हे चित्र कायम राहील तर बदल घडेल. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन सदस्यांनी बैठकीत भाग घेतला. त्यात आता जागा वाटपाबाबत चर्चा होईल. चार जागा लढवताना दहा जागा मागितल्या जातात. मात्र शेवटी चार जागा दिल्या जातात. प्रत्येकाची ताकद पाहून जागा दिल्या जातील, असे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात निवडणुकीच्या चर्चा असल्या तरी भाजपची निवडणुकीला समोर जाण्याची तयारी आहे असे दिसत नाही. इतर राज्यात झालेल्या निवडणूक निकाल पाहता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या होतील, असे मला वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान,आज कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत. निर्यात बंद आहे. जिथे भाव भेटतो तिथे माल पाठवत नाही आणि इथे भाव देत नाहीत. शेतकऱ्याच्या घरात अर्ध्याहून अधिक कापूस शिल्लक आहे. परिस्थिती चांगली नाही. सरकारने जर न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहील. हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार पाऊस लांबेल मात्र महाराष्ट्रात शंभर टक्के जवळपास पाऊस पडेल त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही असे शरद पवार यांनी सांगितले.
मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज या समाज घटकांना आज संरक्षण देण्याची गरज आहे. नांदेडमध्ये घडलेली घटना हा चांगला प्रकार नाही. सर्वात लहान घटकाला न्याय देण्याची सरकारची जबाबदारी आहे. नगर येथील कार्यक्रम पावसाचा अंदाज असल्याने रद्द केला. आहे.भाजप विरोधात आम्ही आक्रमकपणे समोर जात आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.