कोल्हापूर : सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नसल्याचे सांगत कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता देखील सत्ता बदलत असल्याचे दाखवून देईल, असे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी नोटा बंद झाल्या, त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी ते सहन केले. दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला. तीन महिन्यात या नोटा बंद होणार आहेत. लोकांना फार त्रास होईल, असे वाटत नसल्याचे पवार म्हणाले. यावेळी राज्य सरकारकडून आर्थिक शिस्त बिघडवली गेल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, भाजपात अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र, असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहेत, ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील. त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व ठरेल. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीनं बातम्या देऊन ते नेमकं काय साध्य करतात हे अजून पर्यंत कळलेलं नाही, असेही ते म्हणाले.