
उद्या थेट लाईव्ह प्रक्षेपणात गावकऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर (प्रतिनिधी) १८डिसेंबर२०२५ – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यात असलेल्या लोहारा या गावाची केंद्र शासनाच्या ‘सुजल ग्रामसंवाद’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी देशपातळीवर निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हा, राज्य आणि केंद्र अशा तीनही स्तरांवरील छाननीनंतर झाल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद मानली जात आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत लोहारा गावात राबविण्यात आलेल्या कामांची सविस्तर यशोगाथा जिल्हास्तरावरून राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती. राज्यस्तरावर झालेल्या मूल्यांकनात चंद्रपूर जिल्ह्यातून लोहारा गावाची स्टोरी निवडण्यात आली आणि त्यानंतर ती केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. केंद्र स्तरावरही या स्टोरीला मान्यता मिळाल्याने उद्या शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी ‘सुजल ग्रामसंवाद’ कार्यक्रमात लोहारा गावाचे थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
केंद्र स्तरावरुन केंद्रीय सचिव , जल जीवन मिशन , जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली, मिशन संचालक जल जीवन मिशन जलशक्ती मंत्रालय , नवी दिल्ली यांच्या उपस्थितीत सुजल ग्रामसंवाद कार्यक्रम होणार आहे. राज्य स्तरावरुन अभियान संचालक जल जीवन मिशन मंत्रालय , मुंबई, अती अभियान संचालक , जल जीवन मिशन, मुंबई, तसेच राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे उपव्यवस्थापक आईसी तसेच राज्यस्तरावरील अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात लोहारा गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, आशा वर्कर, शाळेतील विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने गावकरी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) मच्छिंद्रनाथ धस, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) सुमीत बेलपत्रे तसेच तालुकास्तरावरील विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘सुजल ग्रामसंवाद’ कार्यक्रमामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गावपातळीवर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावकऱ्यांनी केलेला लोकसहभाग, महिलांचा सहभाग, पाणीपुरवठा व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच घराघरात नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे गावकऱ्यांच्या राहणीमानात झालेला सकारात्मक बदल, आरोग्यावर झालेले चांगले परिणाम, महिलांचा व मुलांचा वेळ वाचणे, जलजन्य आजारांमध्ये झालेली घट यावरही अनुभव कथन करण्यात येणार आहे.
लोहारा गावाने जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत दाखवलेली एकजूट, नियोजनबद्ध कामकाज आणि लोकसहभाग यामुळेच हे गाव आज देशपातळीवर आदर्श ठरत आहे. उद्याच्या थेट प्रक्षेपणामुळे लोहारा गावाचा अनुभव देशभरातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हयातील इतर गावांनी लाईव्ह प्रक्षेपनामध्ये सहभागी होण्याचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केले आहे.














