बीड-भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी शनिवारी महत्वाचे भाष्य केले. पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याप्रमाणेच अनेकांचा पराभव झाला मात्र त्यानंतर अनेकांना आमदारकी, मंत्रीपदे मिळाली आहेत. आपण यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला माझा नेता मिळाला असून त्यांच्याशी मी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना मांडल्या. मी कुणासमोरच कधीच झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांच्या या वाक्याचा मी पुन्हा – पुन्हा उच्चार करते, असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे राजकारण माझ्यासाठी किंवा माझ्या कुंटुंबासाठी नाही. राजकारण माझ्या मतदारांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. केवळ लोकांचे भले करण्यासाठी मी राजकारणात आले असून परिवारासाठी राजकारणात आलेले नाही, असे त्या म्हणाल्या.