मुंबईः दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर आक्षेप असण्याचे कारणच नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना (Devendra Fadnavis on Love Jihad Cases) मांडले. राज्य सरकार लव्ह जिहादच्या प्रकरणांबाबत सजग असून आम्ही त्यावर कायदा करण्याचा विचार करीत आहोत. त्यासाठी सध्या वेगवेगळ्या राज्यातील कायद्यांचा अभ्यास सुरु आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही संवेदनशील आहोत. बेपत्ता महिलांचा शोध घेण्याचे प्रमाण ९० टक्के असून काही जिल्ह्यांमध्ये ते ९५ टक्के देखील आहे. तथापि, या संवेदनशील मुद्याकडे अधिक जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, पण सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन लग्ने केली जात आहेत. विवाहित असलेले लोक वेगळी ओळख देऊन महिलांची फसवणूक करतात. त्यावरून लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत, असे दिसते, असेही फडणवीस म्हणाले.