मुंबई-राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती आहे.
ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे, असे थोरात म्हणाले.















