अयोध्येत उभारले जाणार महाराष्ट्र भवन, उत्तर प्रदेश सरकार जागा देणार

0

मुंबईः अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जाणार (Maharashtra Bhawan in Ayodhya) आहे. या भवनासाठी जागा देण्याची तयारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची (Up CM Yogi Adityanath) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील उपस्थित होते. योगी यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे आयोजित स्नेहभोजनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी (Maharashtra Bhawan in Ayodhya) जागा देण्याची मागणी केली होती. या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी तत्वतः मंजुरी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने त्यांना अयोध्या भेटीचे आमंत्रणही देण्यात आले आहे. यावेळी राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिलीय.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते गुंतवणूकदारांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती आहे. यावरून विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली असून महाराष्ट्रातील उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सिने जगतातील लोकांचीही भेट घेणार असून, नोएडामध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. योगी आदित्यनाथ यांचा एक रोड शो देखील प्रस्तावित आहे.