सरकारी ८१६९ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

0

एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार


मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी (MPSC Advertisement for Government Posts) आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे. या पदभरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही शेवटी अध्यक्ष निंबाळकर यांनी केले आहे.
‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती
● सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
● महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
● वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
● गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
● महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
● गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
● वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
● वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
● मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे