मुंबईः महाराष्ट्र हे सर्वार्थाने श्रीमंत राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे राहील. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचे आहे, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त (MNS President Raj Thackeray) केले आहे. जागतिक मराठी साहित्य संमेलनात एका मुलाखतीच्या दरम्यान ते बोलत होते. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत असून राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. राज्यातील उद्योग बाहेर गेल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टिकेची झोड उठविली होती. याबद्धल विचारले असता राज ठाकरे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासाठी देशातील प्रत्येक राज्य हे मुलासारखे असले पाहिजे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता. आपण स्वतः गुजराती आहोत, म्हणून त्यांनी गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधानांना शोध नाही. मनमोहनसिंह हे पंजाबचे म्हणून पंजाबला प्राधान्य देतील का, उद्या तामीळ पंतप्रधान झाल्यावर सर्व तामीळनाडूला देईल, ही कुठली पद्धत आहे..” या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray on PM Modi) आपली नाराजी व्यक्त केली. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने १८ वे जागतिक मराठी संमेलन सुरु असून या संमेलनात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. एखाद्या भूमिकेला विरोध करणे राजकारणात काही गैर नाही. पण त्या माणसाने चांगली गोष्ट केली तर त्याचे अभिनंदन करण्याचा मोठेपणा आणि मोकळेपणा असावा लागतो. सरकारच्या चांगल्या गोष्टीचे अभिनंदन मी केले असल्याचे राज ठाकरे म्हणाले. “सध्याची राजकीय स्थिती एवढी लयाला गेली की हे राजकारण नाहीच. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांबद्दल बोलणे, कोणी कशावरही बोलायला लागले आहे. आज कोणीही इतिहास तज्ज्ञ होत आहेत. कारण प्रसार माध्यमे हे दाखवायला बसले आहेत. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलिकडे काही दिसत नाही. महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना अमूक नेते काय म्हणाले, यावरच प्रसार माध्यमे भर देत आहेत.” सोशल मीडियावर हल्ली व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असून लोकांच्या व्यक्त होण्यावर आता पैसे आकारायला हवे. त्यामुळे किमान व्यक्त होणे कमी होईल, असेही ते म्हणाले.