मुंबईः राज्यपालपद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल होणे म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात कोणतेही सुख नाही, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari not happy after becoming governor) यांनी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या. जैन समाजाच्या प्रतिनिधीमंडळाशी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी या भावना व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. अलिकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या महापुरुषांबद्धलच्या विधानांपायी वादग्रस्त ठरले असून विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन देखील केली होती. आताही राज्यपाल कोश्यारी यांच्या नव्या विधानाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल म्हणाले की, राज्यपाल होणे म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. मी ८० वर्षांचा झालो आहे. मात्र, जेव्हा संन्यासी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो, असेही कोश्यारी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक जन्माला यावे, पण आपल्या घरात नाही, तर शेजारच्या घरात जन्माला यावेत, अशी लोकांनी भावना असते, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्र मंत्रालय देखील स्थापन व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. सरकारने ज्याप्रकारे जैन तीर्थ सर्कीट तयार केले आहे, त्याचप्रमाणे इतर तीर्थक्षेत्रांचीही निर्मिती व्हावी, असेही ते म्हणाले.