-पाटणबोरीत तयार केली यशवंत आणि सहकाऱ्यांनी सर्व शिल्पे
नागपूर: राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर 26 जानेवारी रोजी झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती या थीमवरील चित्ररथ दुसरा आला आहे. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील संपूर्ण शिल्प विदर्भातील कलावंतांनी अर्थात यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ एनगुर्तीवार यांनी तयार केली आहेत. त्यामूळे पाटणबोरीचे नाव राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरले गेले आहे.
भारताच्या राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा भव्यदिव्य सोहळा साजरा केल्या जातो. प्रत्येक कलावंताला यात सहभागी हे एक स्वप्न असते. भव्यदिव्य पथसंचलनात वेगवेगळ्या प्रांताच्या झाक्या, चित्ररथात सहभागी होत असतात. यावर्षी महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी सप्तश्रृंगी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात लक्षवेधी ठरले. त्यासाठी साडेतीन शक्तीपीठ वरील देवी व अन्य शिल्प साकारण्यात आली आहेत. या चलचित्र देखाव्यासाठी साकारण्यात आलेली सर्व शिल्पे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत एनगुर्तीवार या शिल्पकाराने साकारली आहेत. यशवंत यांना पिढीजात मूर्ती कलेचा वारसा लाभला आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मातीशी खेळण्याचा छंद आहे. त्यातूनच त्यांना शिल्पकलेची आवड निर्माण झाली. गणेश, दूर्गा उत्सव दरम्यान अनेक मूर्ती त्यांनी साकारल्या. महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेर अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅलिफोर्निया दुबई तसेच श्रीलंका येथे त्यांनी विविध शिल्प साकारून पाठविले आहेत. पिढीजात मूर्ती कलेला तांत्रिक व तर्कशुद्ध शिक्षणाची जोड मिळावी म्हणून मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च शिक्षण घेतले. भाऊ संतोष यांच्या प्रेरणेने सध्या भरती कला महाविद्यालय पुणे येथील शिल्पकलेचा विद्यार्थी असलेला यशवंत प्रसिद्ध शिल्पकार म्हणून नावा रूपास येत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या या चित्ररथामध्ये साडेतीन शक्तीपीठाशिवाय देवीसमोर गोंधळ करणारे गोंधळी ज्यामध्ये पोतराज, हलगीवाला, जोगवा मागणारे, व इतर दहा शिल्प साकारली गेली. बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत आणि विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली. याकरिता नीरज, पिंटू ,निखिल,सुरज अरुण ,अक्षय, अविनाश ,आकाश, ओम सांबजवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे यशवंतने सांगितले.
यशवंत यांनी 2015 मध्ये बराक ओबामा भारतात आले असता पंढरीची वारी हे शिल्प साकारले होते. त्यानंतर 2016 मध्ये कर्नाटक येथील झाकी, 2017 मध्ये महाराष्ट्रातील झाकी ज्यामध्ये गणेशोत्सवाची स्थापना करणारे लोकमान्य टिळक यांचे शिल्प आणि आता 2023 मध्ये महाराष्ट्रातील नारीशक्ती या थीमवर आधारित साडेतीन शक्तीपीठचे चलचित्र व उत्तर प्रदेशातील अयोध्या दीपोत्सव यात कुबेराच्या विमानात विराजमान असलेले राम, लक्ष्मण, सीता यांचे चलचित्र त्याच्या हातून साकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन्ही चित्ररथाना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे.
शुभ ऍड्स कंपनी नागपूरचे बीभिषान चावरे चावरे ,नरेश चरडे, यांच्या मार्गदर्शनातून हा संपूर्ण देखावा तयार करण्यात आला. आर्ट डिरेक्टर तुषार प्रधान, व सहाय्यक रोशन इंगोले, श्रीपाद भोंगाडे, नंदकिशोर सालवंतकर यांनी चित्राची थीम तयार केली.