मराठी ही ज्ञान विज्ञान आणि व्यापाराची भाषा व्हावी : सुधीर मुनगंटीवार

0

पुणे : महाराष्ट्रापेक्षा छोट्या असलेल्य़ा फ़्रान्स, जर्मनी यांच्या भाषा जगभरातील लोक शिकतात कारण त्या ज्ञान आणि व्यापाराच्या भाषा आहेत. तसेच मराठी टिकवायची आणि वाढवायची असेल तर मराठी ही ज्ञान विज्ञान आणि व्यापाराची भाषा झाली पाहिजे असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पिंपरी येथे पार पडलेल्या 18व्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते रविवारी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की मराठीच्या एकेका शब्दात प्रचंड ऊर्जा आहे. मरठीत “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे जसे शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे, तसेच “मना सज्जना भक्तीपंथेची जावे” हेही सांगितले आहे. “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी” हेही सांगितले आहे, तसेच “जोडूनिया धन उत्तम व्यवहारे” हेही सांगितले आहे. “वेडात मराठी वीर दौडले सात” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही घोषणाही मराठीतूनच केली गेली होती. मेंदूचा मार्ग पोटातून जातो हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य असे आहे की पोटाचा मार्ग मेंदूतून जातो. त्यामुळे भाषा आणि साहित्य समृद्ध असेल तर मनुष्यही समृद्ध होतो.

मराठीच्या संवर्धनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करणार

सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून तो आणखी पुढे जावा आणि मराठी भाषेची अधिक प्रगती व्हावी म्हणून नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. मराठीच्या संवर्धनात लोकसहभाग वाढविण्याकरता एक संकेतस्थळ (पोर्टल) विकसित करण्यात येईल आणि त्यावर नागरिकांच्या सूचना मागविल्या जातील, अशी घोषणा ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

यावेळी मंचावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील, गोव्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री गोविंद गावडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री रमाकांत खलप, श्री गिरीश गांधी, श्री रामदास फुटाणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री पी.डी.पाटील, माजी परराष्ट्र अधिकारी व लेखक श्री ज्ञानेश्वर मुळे आदि उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा