नवी दिल्लीः राज्यात शिंदे आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढची सुनावणी आता १४ फेब्रुवारीला म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी होणार आहे. (Hearing on Power Struggle postponed once again in Supreme Court) जून महिन्यात शिवसेनेत बंडखोरी होऊन सरकार कोसळल्यावर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्ष गेला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्दा सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून मागील सुनावणीवेळी करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय होू शकलेला नाही. सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. दरम्यान, सलग सुनावणी सुरु होण्याची शक्यताही यासंदर्भात व्यक्त होत आहे.
पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. 2016 च्या अरुणाचल प्रदेशातल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचा समावेश असलेल्या पीठाने अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही, असा निकाल दिला होता. सध्या शिंदे गटाकडून याच निकालाचा आधार घेण्यात येत आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे. मात्र, अरुणाचल आणि महाराष्ट्राच्या केसमधले संदर्भ व घटनाक्रम वेगवेगळा असल्याने त्या निकालाचा सरधोपट अर्थ न काढता अधिक विश्लेषण करुन निकाल द्यावा, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.