
10 जानेवारी हा दिवस जगभरातील हिंदी साधकांसाठी खूप खास दिवस आहे. कारण या दिवशी ‘जागतिक हिंदी दिन’ साजरा केला जातो. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करणे हे या दिवसामागचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. जगात हिंदीला चालना देण्यासाठी आणि हिंदी भाषेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी व हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख निर्माण करू देण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. परदेशातील भारतीय राजदूत हा दिवस विशेषरित्या साजरा करतात. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीमधील व्याख्याने आयोजित केली जातात. जगात हिंदीचा विकास व प्रसार व्हावा म्हणून जागतिक हिंदी परिषदेची सुरुवात झाली. नागपूर येथे 10 जानेवारी 1975 रोजी प्रथम जागतिक हिंदी परिषद झाली, म्हणून हा दिवस ‘जागतिक हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. तेव्हापासून या दिवशी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. हिंदी दिन आणि जागतिक हिंदी दिन यांच्यात फरक आहे. देशात 14 सप्टेंबर रोजी ‘हिंदी दिन’ साजरा केला जातो. त्याचबरोबर 10 जानेवारी रोजी ‘जागतिक हिंदी दिन’ साजरा केला जातो. १९८३ साली भारताची राजधानी दिल्ली येथे तिसरी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. २००६ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दरवर्षी १० जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
हिंदी भाषेचा प्रचार
हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली जाणारी एक भाषा आहे. भारताव्यतिरिक्त नेपाळ, मॉरिशस, गयाना, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि फिजी यांसारख्या इतर देशांमध्येही हिंदी भाषा बोलली जाते. १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी ही देशाची अधिकृत भाषा म्हणून निवडली गेली तो दिवस हिंदी दिवस साजरा केला जातो.