नागपूर :’मातृभाषेच्या सेवेत मायमराठीची सारी नक्षत्रे एकजुटीनं अविरत कार्य करत राहतात. हीच मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानची जमेची बाजू आहे.’ असे भावपूर्ण गौरवोद्गार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आचार्य विजयाताई मारोतकर यांनी काढले.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर द्वारा क्रीडा चौक हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.
‘प्रसंग कोणताही असो, आमची सारी नक्षत्रं स्वेच्छेने स्वतःला झोकून देऊन एकमेकाच्या सहकार्याने काम करतात. हे आमचं खरं बलस्थान.’ असेही त्या पूढे म्हणाल्या.
कविवर्य कुसूमाग्रजांच्या जन्मदिवशी संपन्न झालेल्या या मनोरम सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आचार्य विजयाताई मारोतकर होत्या. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अरविंद बुटले, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध रंगकर्मी मंगेश बावसे आणि संयोजक डॉ.माधव शोभणे हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन झाल्यानंतर प्रा. विनय पाटील यांच्या संगीत निर्देशनात गोविंद सालपे, डॉ.माधव शोभणे, डॉ.मोनाली पोफरे, सौ. प्रज्ञा खोडे व सौ.नीता अल्लेवार यांनी सुरेल मराठी गौरव गीत आणि मायमराठी प्रतिष्ठान गौरव गीत सादर केले.
प्रतिष्ठानच्या संगीत विभागातर्फे प्रा.विनय पाटील रचित मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान गौरवगीताची मुद्रीत प्रतिमा आ.विजयाताईंना सन्मानपूर्वक भेट म्हणून देण्यात आली.
यानंतर कवीवर्य कुसूमाग्रजांना आदरांजली व मायबोलीचा गौरव म्हणून काव्यसंमेलन घेण्यात आले. अध्यक्षांच्या कवितेनंतर उद्घाटक डॉ.अरविंद बुटले, प्रमुख अतिथी मंगेश बावसे आणि संयोजक डॉ.माधव शोभणे यांनीही आपल्या कविता सादर केल्या. सौ.अरूणा कडू, नीता अल्लेवार, डॉ.राजेश काळे, चरणदास वैरागडे, डॉ.मोनाली पोफरे, प्रज्ञा खोडे, प्रा. विनय पाटील, प्रणोती कळमकर, आश्विनी दुरूगकर, जीवन राजकारणे, अरूणा भोंडे, डॉ.सुनंदा जुलमे, संजीवनी मराठे, स्मिता किडीले, भावना टेकाडे, भारती भाईक, निमा बोडखे, वैशाली मुलमुले आणि गोविंद सालपे यांनी आपल्या कविता सादर केल्यात. यात मायमराठी गौरव, ईश्वरभक्ती, प्रेम, समाजप्रबोधन इत्यादी विविध विषय समाविष्ट होते.
समारोपीय मनोगतात अध्यक्ष आचार्य विजयाताई मारोतकर यांनी सर्वांच्या कवितांचा सर्वस्पर्शी यथोचित आढावा घेत सुंदर कविता सादर केली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सौ.अरूणा कडू, तर उत्तरार्धात गोविंद सालपे यांनी सूत्रसंचालन केले. नीता अल्लेवार यांनी आभार मानले.
डॉ.माधव शोभणे यांच्या संयोजनात मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.