दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. मेहेंदळे यांचे निधन

0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दूरदर्शनवरील पहिले वृत्तनिवेदक म्हणून ओळख लाभलेले डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे सोमवारी सकाळी मुंबईत मुलुंड येथे निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणूनही ते प्रसिद्ध (Dr Vishwas Mehendale) होते. गेले दोन तीन महिने ते आजारी होते. दीर्घकाळ पुण्यात वास्तव्याला असणारे डॉ. मेहेंदळे गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मुलुंड येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली आहेत.


दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे डॉ. मेहेंदळे हे पहिले वृत्तनिवेदक होते. याशिवाय ते मुंबई दूरदर्शनचे देखील पहिले वृत्तनिवेदक होते. या मुंबई केंद्राचे संचालक म्हणून त्यांची बरीच वर्षे जबाबदारी सांभाळली. मेहेंदळे हे रंगकर्मीही होते. अमोघ वक्तृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या डॉ. मेहेंदळे यांनी नाटकातूनही भूमिका केल्या होत्या. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन अशा विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम लोकप्रिय होता. ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके आहेत.सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपद त्यांनी भूषविले होते.


माध्यम क्षेत्रातील अभ्यासू वाटाड्या हरपला-मुख्यमंत्री


माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची शैलीही अनेकांना भावणारी अशी होती. त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाच्या काळात स्वतः प्रयोगशील राहून नव्या पिढीला तंत्रज्ञान, सादरीकरण यातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी वाटाड्या सारखेच होते. ज्येष्ठ माध्यमातज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

*Shankhnaad Khadyayatra| ep.70. मुंबई वडापाव आणि हेल्दी सॅण्डवीच | Daily Breakfast Recipes*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा