नागपूर : सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, नागपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिका नेहरूनगर येथील कर्मचारी शंकर मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून दीपक खरे होते व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे विद्यार्थी प्रतिक वायले व राखी शर्मा यांनी मराठी माणसांच्या वेशभूषा परिधान केल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, चारोळ्या, भाषण, प्रश्नमंजुषा अशा विविध माध्यमातून मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील सहायक शिक्षक विजेश आडे यांनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली बुरबुरे व आभार प्रदर्शन भारती नगरारे यांनी केले.