जालना- मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार असून आंतरवली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. गावातील १०० एकर शेतात आयोजित होणाऱ्या या जाहीरसभेसाठी राज्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र होत आहेत. या सभेत मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा, कोपर्डीतील तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, यासह काही मागण्यात जरांगे पाटील यांच्याकडून मांडल्या जाण्याची शक्यता आहे. वेगळा प्रवर्ग करुन टिकणाऱ्या आरक्षणाची तसेच पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात उपोषण करणाऱ्या जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यातील दहा दिवस शिल्लक असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आजच्या जाहीरसभेत ते काय घोषणा करतात, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १०० एकरात होणाऱ्या सभेसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च येतो व एवढे पैसे कुठून आले? असा सवाल छगन भुजबळांनी विचारला आहे. त्यामुळे तणावात भर पडली असून जरांगे काय भाष्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.















