Home Top News “आता एक इंचही मागे हटणार नाही”, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

“आता एक इंचही मागे हटणार नाही”, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

0

जालना- दहा दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या व त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील जाहीरसभेत मनोज जरांगे यांनी दिला. (Maratha Reservation Issue) “तुमचा मुलगा म्हणून सांगतोय की, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. आम्ही सरकारला शेवटची विनंती करतो. मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचे काम आता बंद करा. चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो, असे आश्वासन तुम्ही दिले होते. आता पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा”, अशी मागणी जरांगे यांनी केली.(Manoj Jarange Patil)
यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती केली. या राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा, सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा जाहीर निर्णय करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले की, केंद्राला आणि राज्याला सांगतो, आज मराठ्यांचं ‘आग्या मोहोळ’ शांत आहे. हे ‘आग्या मोहोळ’ एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचे नाही. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहू नये. माझेही लेकरू नोकरीला लागले पाहिजे, हे गोरगरीब मराठ्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा आरक्षण जाहीर करावे, असेही ते म्हणाले.