गोंदिया (Gondia):- शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या कारचा खड्ड्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात आमदार कोरोटे (Sahasram Korote) यांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही, मात्र ही घटना नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनली आहे.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी म्हटले की, जर आमदारांचीच कार या प्रकारे खड्ड्यात घुसत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय होणार? त्यांची सुरक्षितता कशी राखली जाणार? शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाची या प्रश्नांकडे अनास्था हेच या प्रकारणातून समोर आले आहे.
गोंदिया शहरातील अनेक रस्ते मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेले आहेत, त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पावसाळ्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचून अधिकच धोकादायक परिस्थिती निर्माण होते. नागरिकांनी प्रशासनाला वारंवार याबद्दल तक्रार केली असली तरीही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.या घटनेमुळे सामान्य जनतेतून प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी मागणी केली आहे की, शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती केली जावी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.