
अंगप्रदर्शन करण्याच्या प्रकरणात उर्फी जावेदला नोटीस
मुंबई: भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद सुरुच असून मुंबई पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करण्याच्या प्रकरणात उर्फी जावेदला नोटीस बजावली (Mumbai Police notice to Model Urfi Jawed) आहे. उर्फी जावेदला शनिवारी अंबोली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहायचे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती करणारे पत्र त्यांना दिले होते. महिला आयोगाकडेही वाघ यांनी तक्रार केली. मात्र, त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर विरुद्ध चित्रा वाघ असाही वाद सुरु झाला होता. चाकणकरांनी या प्रकरणात लक्ष घालणार नसल्याचे सांगत वाघ यांनाच नोटीस धाडली होती. या दरम्यान उर्फीने ट्विटच्या माध्यमातून सातत्याने चित्रा वाघ यांना ‘सासू’ असे संबोधत डिवचण्याचे प्रकार सुरु ठेवले. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला असून उर्फीला बजावण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागलेले आहे.
या प्रकरणाची सुरुवात चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदवर झालेल्या टिकेने झाली होती. सार्वजनिक ठिकाणांवर उर्फी जावेद तोकड्या कपड्यांमध्ये वावरत असल्याचे नमूद करत चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केली होती.