पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक

0

गुरुवारी ही घटना उघडकीस आली होती

नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या (Tiger Poaching in Pench Project) पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बिटजवळील तलावात वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. या घटनेच्या तपासात अवघ्या 12 तासांत चार आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी फरार असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. या वाघाला विजेचा शॉक देऊन ठार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्यानंतर वाघाच्या शरीराचे तुकडे करून ते तलावाच्या खोल पाण्यात दगडांच्या साह्याने बुडवून ठेवण्यात आल्याचे वन विभागाच्या तपासात आढळून आले. वनविभागाच्या तपास पथकाने वाघाचे अवयव कापलेली जागाही शोधून काढली असून ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकऱ्यांना लक्षात हा प्रकार आल्यावर वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. सुरुवातीला पाण्यात सापडलेले प्राण्याचे तुकडे वाघाचे आहे की कसे, याचे नक्की निदान होत नव्हते. सखोल चौकशीनंतर तो वाघच असल्याचे निष्पन्न झाले.
व अधिकाऱ्यांनी पथकासह तातडीने तलावावर धाव घेऊन पाहणी केली. मात्र तो नक्की वाघच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. परंतु कापलेल्या अवयवांना मोठे दगड बांधलेले आढळल्यावर संशय बळावला. त्यानंतर तो वाघच असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. पेंचच्या क्षेत्रसंचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू उइके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. आसपासच्या गावांमध्ये चौकशी केल्यावर गुरुवारी रात्री घोटी गावातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या तिघांनी वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीतून चौथ्या आरोपीचा छडा लागला व त्यालाही अटक करण्यात आली. या घटनेत आणखी काही लोकांनी या आरोपींन सहकार्य केल्याची माहिती असून ते फरार असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींचा १७ जानेवारीपर्यंत वन कोठडी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.