लुधियाना: ‘काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शनिवारी पक्षाचे जालंधर येथील खासदार संतोख सिंग चौधरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले (Congress MP Dies of Heart Attack during Bharat Jodo Yatra ) आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये प्रवासाला आहे. शनिवारी सकाळी फिलूर येथून पदयात्रेला सुरुवात होताच खासदार संतोख सिंह चौधरी यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भारत जोडो यात्रेला शनिवारी विश्राम देण्यात आल्याची माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यात काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुदैवी घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी लोडोवाल येथून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. काही वेळातच फिलूर येथे खासदार संतोख सिंह चौधरी यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णवाहिकेने फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खासदार संतोख सिंह यांचा घटनास्थळीच किंवा वाटेतच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तसेच खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. भारत जोडो यात्रेला आज विश्राम देण्यात आल्याची माहिती आहे.