नागपूर – बिलासपूर वंदे भारत : लवकरच ट्रायलची शक्यता

0

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू ; रेल्वे स्टेशनची स्वच्छता सुरू


नागपूर. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) 11 डिसेंबरला शहरात येत आहेत. याचवेळी त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा (Bilaspur-Nagpur-Bilaspur Vande Bharat Express ) शुभारंभ देखील केला जाणार आहे. या सेवेला केवळ 5 दिवसच शिल्लक असले तरी ट्रेनचा रॅकच मिळू शकला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारतचा रेक गुरुवारी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 9, 10 डिसेंबरला बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन (Trial run of Vande Bharat Express) शक्य आहे. तुर्त वंदे भारत एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचा वाढला रक्तदाब


वंदे भारत ट्रेन पंतप्रधानांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. नागपूरहून या ट्रेनची सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान स्वतः येत आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांच्या कार्यक्रमाची निश्चिती झाली. त्यामुळे नागपूर, मुंबईपासून बिलासपूरपर्यंत एकच खळबळ उडाली आहे. या गाडीच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेकडे असली तरी नागपूर स्थानक मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या अखत्यारीत येते. अशा स्थितीत झोन आणि विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 11 डिसेंबरला दुपारी 2.15 वाजती ही ट्रेन नागपूरहून रवाना केली जाऊ शकते. पण, अद्याप गाडीला क्रमांकही दिला गेला नाही. याएकूणच परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला आहे.

नागपूर स्टेशनची युद्धस्तरावर स्वच्छता


पंतप्रधान बिलासपूर-नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ करणार असल्याचा कार्यक्रम आज निश्चित झाला. त्यानंतर तातडीने नागपूर स्थानकावर स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले असून युद्धस्तरावर कामे केली जात आहेत. इमारत व परिसर पाण्याने स्वच्छ केला जात आहे. स्वच्छतेबाबत पंतप्रधान मोदींचे कठोर धोरण सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे ट्रॅकपासून संपूर्ण परिसर चकाचक केला जात आहे. तिकडे मुंबई आणि बिलासपूर झोनचे सर्व वरिष्ठ अधिकारी नागपुरात दाखल होऊन तळ ठोकणार असल्याचीही माहितीही समोर आली आहे.

वंदे भारतचे वैशिष्ट्य


वंदे भारत ही स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे साकारलेली देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. कमाल वेग ताशी 180 किमी आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने धावेल. पूर्ण वेगात धावल्यानंतरही काचेतून पाण्याचा थेंबही बाहेर पडणार नाही, ऐवढे सस्पेन्शन मजबूत आहे.