आता गडचिरोलीत विद्यार्थ्यांना विषबाधा, अंबाडीच्या भाजीतून ओढवले संकट ; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

0

अंबाडीच्या भाजीतून ओढवले संकट ; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार


गडचिरोली. तीन दिवसांपूर्वीच नगापूरच्या (In Nagpur) एका शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटमधून विषबाधा झाल्याने 17 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड (Bhamragad) तालुक्यातील कोठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा (Food poisoning in students ) झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला. 22 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 7 जणांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना विषवाधा होण्याच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धास्तावलेल्या पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा प्रकार पालकांसोबतच शिक्षकांसाठीही दोकेदुखी ठरला आहे.
शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून निवासासोबत जेवणाचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, येथील काही विद्यार्थ्यांनी गावातील नातेवाईकांकडून अंबाडीची भाजी आणली व जेवताना मित्रांमध्ये वाटली. शाळेत गेल्यानंतर ७ विद्यार्थिनींना पोटदुखी, उलट्या झाल्याने त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेतील 15 विद्यार्थ्यांनादेखील प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित 16 विद्यार्थ्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, असे भामरागडचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नातेवाईकांकडून आणलेल्या अंबाडीच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
विदर्भात सातत्याने अन्नातून विषबाधेच्या घटना समोर येत आहे. चालू आठवड्यातील ही चौथी घटना घडली आहे. नागपूरच्या मदन गोपाल शाळील विद्यार्थ्यांना शुक्रवारी अनोळखी व्यक्तीने चॉकलेट वाटले. चॉकलेट खाताच त्यांना भोवळ येऊ लागली. यामुळे 17 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापूर्वी भंडाऱ्यात 200 वऱ्हाड्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. सोमवारी अचलपुरात साखरपुड्याच्या जेवणातून 60 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. सातत्याने समोर येणाऱ्या घटना लक्षात घेऊन प्रत्येकाने अन्नाची खात्री करूनच ग्रहण करण्याची गरज निर्माण झाली आहे.