नागपूर :विधिमंडळ अधिवेशनाचा मुहूर्त जाहीर झाला की ( nagpur ) नागपुरात प्रशासनिक कामांची लगबग सुरू होते. विशेषतः आमदार निवास आणि रवि भवनाच्या सजावटीला लोक जुंपतात. रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटीही वेगात सुरू होते. आमदार साहेब राहायला येणार म्हणून ( MLA residence ) आमदार निवासातल्या व्यवस्था पंचतारांकित करण्याचाही प्रयत्न होतो. कधी नव्हे ते बिछान्यावर पांढऱ्या स्वच्छ चादरी अंथरल्या जातात. पडदे बदलले जातात, नवीन क्राॅकरी येते. संपूर्ण इमारतीचा रंग, रुप बदलते. कारण इथे निवासाला प्रत्यक्ष आमदार साहेब येणार असतात.
प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच असते. आमदार साहेब तर इकडे फिरकत देखील नाहीत. कारण, त्यांच्या दृष्टीने इथल्या व्यवस्था त्या दर्जाच्या नसतात. शिवाय एका खोलीत पार्टीशन करून केलेली कार्यकर्त्यांची व्यवस्था देखील त्यांना पसंत पडत नाही. त्यामुळे नावावर मिळालेली खोली कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करून आमदार ( Saheb Hotel, Government Rest House ) साहेब हाॅटेल, शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतात. आजघडीला आमदार निवासात ४०३ खोल्यांच्या व्यवस्थेचा फारतर ५० आमदार लाभ घेत आहेत. उर्वरीत सर्वांनी आमदार निवासाच्या बाहेर स्वतःची व्यवस्था केली आहे. यात सत्ताधारी, विरोधी पक्ष, अशा सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेली आमदार निवासातील व्यवस्था जर आमदारांना आवडत नसेल, ती त्यांच्या दर्जाची नाही, अशी त्यांची भावना असेल, तर मग सरकारने या व्यवस्थेबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण, कोट्यवधी रुपयांची उधळण लोकप्रतिनिधींच्या पीए, अंगरमनक्षक आणि कार्यकर्त्यांवर होणे कितपत योग्य आहे, असेही मत यासंदर्भात व्यक्त होऊ लागले आहे.