भलतीच भानगड आली समोर
नागपूर. पोलिसांनी एका 63 वर्षीय हॅण्डलूम व्यापाऱ्याकडून 1100 ग्रॅम सोन्याच्या प्लेट्स जप्त केल्याची माहिती पसरल्याने शुक्रवारी नागपूरच्या गांधीबाग परिसरात (Gandhibag area of Nagpur) एकच खळबळ उडाली होती. चौकशीत ज्या व्यापाऱ्याकडे प्लेट्स मिळाल्या, ते स्वत:च प्रॉपर्टी मिळत असल्याच्या लोभाला बळी पडले असून त्यांची जवळपास 33 लाख रुपयांनी फसवणूक (Fraud) झाल्याचे उघडकीस आले. तपासादरम्यान आणखी एका 40 वर्षीय हॅण्डलूम व्यापाऱ्याचे नाव समोर आले असून त्यानेसुद्धा लोभात 40 लाख रुपये गमावले असल्याचे पुढे आले. मात्र तो समोर यायला तयार नाही. दरम्यान धातू परिक्षणात त्या सोन्याच्या प्लेट्स बनावट निघाल्या. विशेष म्हणजे प्रत्येक प्लेटवर अलहाबाद बँकेची सील लागलेली आहे. व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा आरोपी वर्धा मार्गावर रहात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पोलिस गुन्हा नोंद व्हायचा असल्याने त्याचे नाव सांगण्याचे टाळत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय व्यापाऱ्याकडे एक व्यक्ती आला. त्याने युनियन बँकेचा रिकव्हरी एजंट असल्याची बतावणी केली. तसेच जे बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकत नाही त्यांची मालमत्त सीज करून ती विकण्याचे कामही करीत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे अनेक मोक्याच्या जागेवर स्वस्तात प्रॉपर्टी उपलब्ध आहे. व्यापाऱ्याने त्याच्यावर विश्वास केला. एजंटने त्यांना एक मालमत्ता दाखवली. ती आवडल्यामुळे अमोल यांनी त्या एजंटला 40 लाख रुपयेही दिले. याच दरम्यान 63 वर्षीय व्यापारी सहजच अमोलच्या दुकानात आले. अमोलने त्यांना एजंट बद्दल माहिती देऊन त्याच्याकडे स्वस्तात प्रॉपर्टी असल्याचे सांगितले. त्यांनीही प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपीने त्यांना शहरातील एक मोठी इमारत दाखवली. तसेच या इमारतीतील भाडेकरूंकडून दर महिन्याला 2 ते 3 लाख रुपये मिळत असल्याची माहिती दिली. वयोवृद्धा व्यापारीही त्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी त्याला 33 लाख रुपये दिले. दोघांकडूनही पैसे घेतल्यानंतर आरोपी प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात टाळाटाळ करू लागला. यामुळे दोन्ही व्यापाऱ्यांनी पोलिसात तक्रार नोंदविण्याचा इशारा दिला.
बॅग भरून पाठविल्या प्लेट
आरोपीने पोलिसात न जाण्याची विनंती केली. तसेच काही वेळात त्याचा एक मुलगा तुमच्याकडे सोने घेऊन येत असल्याचे सांगितले. ते विकून तुम्ही तुमची रक्कम वसूल करा आणि उर्वरित पैसे मला द्या असे सांगितले. व्यापारी पुन्हा एकदा आरोपीच्या भूलथापांना बळी पडले. दरम्यान त्याच दुकानात एक मुलगा सोन्याच्या प्लेट्स असलेली बॅग सोडून गेला. त्या प्लेट्सवर अलहाबाद बँकेची सील होती. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी त्या प्लेट्सची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला याबाबत सांगितले. आरोपीने सोन्याची पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. मी मुलाला पाठवत आहे, तुम्ही ती बॅग त्याला परत करा. मी रोख पैसे देतो असे सांगितले. मात्र, आरोपीने पाठवलेला मुलगा दुकानात पोहोचण्यापूर्वीच पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी सोन्याच्या प्लेट्सनी भरलेली बॅग जप्त केली आणि व्यापाऱ्याला ठाण्यात घेऊन गेले. याच्या 15 मिनिटानंतरच आरोपीने पाठवलेला मुलगा पुन्हा दुकानात पोहोचला, मात्र पोलिसांनी धाड टाकल्याचे समजताच पसार झाला. प्रकरण हायप्रोफाईल दिसून येत असल्याने पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे.