नेट्टारू हत्याकांड : एनआयएने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

0

04MNAT11 नेट्टारू हत्याकांड : एनआयएने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

पीएफआयच्या दोघांचा शोध घेऊन केली अटक

बेंगळुरू, 04 मे  : कर्नाटकातील भाजप नेते प्रवीण नेट्टारू हत्याकांडात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी 2 आरोपींच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेय. यातील एक आरोपी बऱ्याच दिवसांपासून फरार होता, त्याला एनआयएच्या पथकाने शोधून अटक केली आहे. आरोपपत्रात नाव असलेल्या दोन आरोपींपैकी एकाचे नाव थुफैल एमएच तर दुसऱ्याचे नाव मोहम्मद जबीर आहे. आतापर्यंत एकूण 21 आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सदस्यांनी समाजात दहशत पसरवण्याच्या आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने नेट्टारूची सार्वजनिकरित्या हत्या केली होती. एनआयएने 20 जानेवारी रोजी प्रारंभिक आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी एनआयएने सांगितले होते की पीएफआयने आपल्या कथित शत्रूंना आणि लक्ष्यांना मारण्यासाठी गुप्त ‘हिट स्क्वाड्स’, ‘सर्व्हिस टीम्स’ किंवा ‘किलर स्क्वाड्स’ तयार केले होते. पीएफआयच्या या सक्रीय टोळ्यांचे मास्टर माईंडस कोडागु जिल्ह्यात राहत होते. हे लोक त्यांच्या साथीदारांना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील फ्रीडम कम्युनिटी हॉलमध्ये शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण द्यायचे.

या लोकांनी कर्नाटकातील कोडागु, म्हैसूर आणि तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील 3 हल्लेखोरांना आश्रय दिल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, जबीर हा पीएफआय पुत्तूर जिल्हा अध्यक्ष होता आणि हत्येच्या कटात त्यात सक्रिय सहभाग होता. विशेष म्हणजे, बेल्लारे परिसराजवळील पोल्ट्री शॉप मालक आणि भाजप नेते प्रवीण नेट्टारू यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दुचाकीस्वारांनी हल्ला केला. त्यानंतर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. प्रवीण नेट्टारूंवर हल्लेखोरांनी कुऱ्हाडी आणि तलवारीने हल्ला केला होता. हत्येमागील कारण मात्र समजू शकले नव्हते. या संदर्भात, एनआयएने 4 ऑगस्ट 2022 रोजी तपास सुरू केला. यामध्ये आता 21 जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.