Home Artical Blog तरुणी छळ व धर्मांतर प्रकरणात निदा खान न्यायालयीन कोठडीत

तरुणी छळ व धर्मांतर प्रकरणात निदा खान न्यायालयीन कोठडीत

0

नाशिक(Nashik): बहुराष्ट्रीय कंपनीतील एका तरुणीवर अत्याचार, विनयभंग तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निदा एजाज खान हिला नाशिक रोड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार तिची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, विशेष तपास पथकाने या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी आरोपी निदा खान हिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष तपास पथकाचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी तपासातील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीच्या बाजूने अॅड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. तपासादरम्यान पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्यात आल्यामागे नियोजित धार्मिक कट असल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देत होती. तसेच विशिष्ट धर्माच्या प्रार्थना करण्यासाठी आणि त्या धर्माशी संबंधित पोशाख परिधान करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही उघड झाले आहे. पीडितेवर मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकून तिचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपास पथकाने केला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या तथ्यशोध समितीच्या चौकशीतही अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. समितीच्या अहवालानुसार, संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या नाशिक कार्यालयात आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि रझा मेमन यांचा प्रभाव होता. कंपनीतील असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी यांनी संबंधितांना संरक्षण दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात बोलण्याचे धैर्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

समितीने सादर केलेल्या अहवालात आरोपींनी कार्यालयातील वर्चस्वाचा वापर करून महिलांना लक्ष्य केले आणि त्यांचा मानसिक, भावनिक तसेच लैंगिक छळ केल्याचे गंभीर निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा २०१३ अर्थात ‘पॉश’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.

कंपनीच्या पुणे आणि नाशिक कार्यालयांसाठी एकच अंतर्गत तक्रार समिती कार्यरत असल्याचे समोर आले असून, समिती सदस्यांनी नाशिक कार्यालयाला भेट न दिल्याचेही उघड झाले आहे. तसेच कंपनीत ‘पॉश’ कायद्याबाबत आवश्यक माहिती फलक नसल्याने कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपत असल्याने या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! निदा खान प्रकरणी TCSचा मोठा निर्णय, थेट तिला... नेमकं काय झालं? - Marathi News | Nashik Company has suspended Nida Khan and court hearing on her bail plea is scheduled