
नागपूर(Nagpur), दि. ११ मे २०२६: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान सूर्यघर – मोफत वीज योजने’ने देशात स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेची नवी लाट निर्माण केली असून, या मोहिमेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने एक ऐतिहासिक शिखर सर केले आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील १ लाख ७०८ ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर वीज निर्मिती प्रकल्प यशस्वीरीत्या उभारून या क्रांतीत सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात कार्यान्वित झालेल्या एकूण सौर वीज निर्मिती प्रकल्पांपैकी एकट्या नागपूर परिमंडळाचा वाटा तब्बल १७.७२ टक्के इतका मोठा असून, स्थापित क्षमतेत हा वाटा 17.78 टक्के आहे. या कामगिरीमुळे नागपूर परिमंडळ राज्याच्या सौर नकाशावर अग्रस्थानी झळकत आहे.
या सौर क्रांतीत नागपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जिल्ह्यात ८२ हजार ६०१ ग्राहकांनी सौर ऊर्जेचा स्वीकार केला असून, वर्धा जिल्ह्यातील १८ हजार १०७ ग्राहकांनीही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या एकूण १ लाख ७०८ सौर प्रकल्पांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता ३८२.६ मेगावॅट इतकी प्रचंड आहे. यात नागपूर जिल्ह्याचा वाटा ३१७.८२ मेगावॅट, तर वर्धा जिल्ह्याचा वाटा ६४.७६ मेगावॅट इतका आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास, महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवर ५ लाख ६८ हजार २९३ ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता तब्बल २१५१.६९ मेगावॅटवर पोहोचली आहे. सामान्य कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारे थेट अनुदान. १ किलोवॅटसाठी ३० हजार, २ किलोवॅटसाठी ६० हजार, तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते. सौर संचासाठी केलेली गुंतवणूक साधारण ३ ते ४ वर्षांत वीज बिलाच्या बचतीतून वसूल होते आणि त्यानंतर पुढील २० ते २५ वर्षे ग्राहकांना मोफत किंवा नाममात्र खर्चात वीज उपलब्ध होते. यामुळे घरगुती बजेटवरील विजेच्या बिलाचा ताण कायमचा संपुष्टात येतो.
या योजनेत ‘नेट मीटरिंग’ची विशेष सोय आहे. ग्राहकाने उत्पादित केलेली वीज स्वतःच्या वापरापेक्षा जास्त असल्यास ती ग्रीडद्वारे महावितरणला दिली जाते. या अतिरिक्त विजेचा मोबदला ग्राहकाच्या बिलात समायोजित केला जातो किंवा त्याचे पैसे मिळतात. यामुळे ग्राहक आता केवळ वीज वापरकर्ता न राहता स्वतः वीज निर्माता बनला आहे.
वाढत्या जागतिक तापमानाच्या काळात सौर ऊर्जा हा सर्वात शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. म्हणूनच नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील उर्वरित नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या आणि फ्लॅट धारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. इच्छुकांनी आजच pmsuryaghar.gov.in या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून आपले घर ‘सूर्यघर’ बनवावे आणि राष्ट्र उभारणीसह हरित ऊर्जेच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे. या योजनेमुळे केवळ वैयक्तिक आर्थिक फायदाच नाही, तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेलाही मोठी शक्ती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

















