Home Artical Blog पत्नीच्या वादानंतर तरुणाचे टोकाचे पाऊल; खिडकीच्या सज्जावर अडकला

पत्नीच्या वादानंतर तरुणाचे टोकाचे पाऊल; खिडकीच्या सज्जावर अडकला

0

नागपूर(Nagpur): शहरातील रामदासपेठ परिसरात रविवारी रात्री मोठा थरार पाहायला मिळाला. एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील अरुंद खिडकीच्या सज्जावर एक तरुण अडकून बसल्याचे दिसताच परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीबाहेर हा तरुण बसलेला दिसून आला. एका हाताने त्याने छोटी वायर पकडली होती. त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

दरम्यान, संबंधित तरुणाचे नाव आकाश असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री तो दारूच्या नशेत पत्नीला भेटण्यासाठी सासरच्या घरी गेला होता. यावेळी त्याच्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद पुढे धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर आकाश तेथून निघून रामदासपेठेतील आशिष अपार्टमेंटमध्ये शिरला आणि थेट इमारतीच्या गच्चीवर पोहोचला. दारूच्या नशेत त्याने पाइपच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक तोल गेल्याने तो खिडकीबाहेरील अरुंद सज्जावर अडकून पडला. नशेमुळे त्याला परिस्थितीचे भान नव्हते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शिताफीने आणि जीव धोक्यात घालून जवानांनी बचावकार्य राबवत अखेर आकाशला सुरक्षित बाहेर काढले. सुटका झाल्यानंतर भावूक झालेल्या आकाशने रडत रडत सर्वांचे आभार मानले.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळेत मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.