
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचे सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात उद्घाटन झाले. शताब्दी वर्षातील या वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी संघाचे सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी अतुलजी लिमये, सहसरकार्यवाह रामदत्तजी, वर्गाचे सर्वाधिकारी व जयपूर प्रांत संघचालक महेंद्र सिंह मग्गोजी उपस्थित होते. त्यांनी भारतमातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून वर्गाचे उद्घाटन केले. यंदाच्या वर्गात देशभरातून ८८० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या वर्गात सामाजिक जागृती आणि सामाजिक बदलांशी निगडीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रसंगी स्वयंसेवकांना संबोधित करताना सहसरकार्यवाह अतुलजी लिमये म्हणाले, आपला जन्म भारतात झाला, संघाच्या संपर्कात आल्यानंतर सर्व स्वयंसेवक झालो आणि संघाच्या शताब्दी वर्षात कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय मध्ये सहभागी होणे हे आपले सौभाग्यच आहे. शताब्दी वर्षापर्यंतच्या प्रवासात संघाला उपहास, दुर्लक्ष आणि विरोधाचा सामना करावा लागला. तीन वेळा बंदीही घालण्यात आली होती. परंतु ही यात्रा स्वयंसेवकांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे शक्य झाली. सामान्य वाटणाऱ्या स्वयंसेवकांच्या असामान्य वर्तनाने संघाला आकार दिला. ते म्हणाले की, संघाची व्यक्तिमत्त्व विकास प्रक्रिया विकेंद्रित आहे. संघाची दैनंदिन शाखा हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे, संघ प्रशिक्षण वर्गदेखील व्यक्तिनिर्माणाचे कार्य करतात. संघ प्रशिक्षण वर्गाची सुरुवात १९२७ मध्ये झाली. काळानुसार वर्गांची पद्धत बदलली आहे. तथापि भारत एक हिंदू राष्ट्र आहे, सर्वोच्च गौरव प्राप्त करण्यासाठी संपूर्ण समाजाला संघटित करणे हे ध्येय आणि समाजाला संगठित करण्यासाठी व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया ही तीन मूलभूत तत्त्वे कायम आहेत. नागपूरमध्ये आयोजित होत असल्यामुळे या वर्गाला असाधारण महत्त्व आहे. या वर्गात शारीरिक आणि मानसिक सिद्धतादेखील आवश्यक आहे. तीच प्रक्रिया या वर्गात घडते. आपण अमृतकाळाच्या टप्प्यांचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले आहे. आपण या काळाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. या वर्गात शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासोबतच एक अनोखा अनुभव मिळतो. वेगवेगळ्या प्रदेशांतील लोक एकत्र राहतात. ‘आपण सर्व एक आहोत,’ या एकत्वाच्या भावनेची अनुभूती या वर्गात मिळेल. गौतम बुद्ध म्हणाले होते की मी मोक्षाचा मार्ग दाखवतो, जे त्या मार्गाचा अनुसरण करून निरंतर चालत राहतात, तेच तिथे पोहोचतात. आपल्या मार्गाचे अनुसरण व्हावे याकरिता स्वयंसेवकांना सिद्ध करण्यासाठी या वर्गातून त्यांना तयार केले जाते. हा वर्ग पुढील २५ दिवस चालेल आणि ४ जून रोजी समारोप होईल. समारोप समारंभास प.पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत उपस्थित राहतील.

















