इंफाल, 14 जून : मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत उफाळून आलेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. मणिपूरच्या खमेनलोक परिसरात मंगळवारी रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली आहे.राज्यातील खमेनलोक गावातील काही घरांना आग लावण्यात आली आहे. तसेच तामेंगलोंग जिल्ह्यातील गोबाजंग भागात देखील काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यासंदर्भात माहिती देताना पूर्व इंफालचे पोलिस आयुक्त शिवकांत सिंह म्हणाले की, खमेनलोक परिसरात भडकलेल्या हिंसेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात मृत्यू झाला आहे त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या शरीरावर जखमा असून गोळ्यांच्या जखमा आहेत. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये 3 मे रोजी हिंसाचार झाला होता. मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केल्यानंतर कुकी समाजाने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्यात सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स गटातील अतिरेकी सहभागी होऊ शकतात, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. दुसरीकडे, कुकी गटांकडून या हिंसाचारासाठी दोन कट्टरपंथी गट अरामबाई टेंगगोल आणि मेईतेई समुदायाच्या मीतेई लीपुन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. इंफासमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरची शांतता आणि समृद्धी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले.