मुंबई : नाशिक (nashik) पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे (satyjit tambe) यांना भाजप पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु असली तरी अद्याप त्यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. बावनकुळे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांनी अजून कुठलेही समर्थन मागितलेले नाही. तांबे यांनी समर्थन मागितल्यास भाजप त्यावर विचार करेल, केंद्रीय संसदीय समितीकडे तशी संमती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. भाजप अपक्षाच्याच भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली असून महाविकास आघाडीचे एक दिल के टुकडे हुए हजार, कही कहा गिरा, कही कहा गिरा, अशी अवस्था झाली असल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
बावनकुळे म्हणाले, काँग्रेस पक्षाला नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून काँग्रेसमध्ये बूथ लेव्हलपर्यंत कुणीही काम करायला तयार नाही. त्यांना हे समजून चुकले की २०४७पर्यंत काँग्रेसला काही चांगले दिवस नाही. त्यामुळे ३०-३० वर्ष काँग्रेसमध्ये राहून कुणालाही आयुष्य खर्ची घालायचे नाही. काँग्रेसमध्ये नेत्याचा मुलगाच आमदार होऊ शकतो. मंत्र्याचा मुलगाच मंत्री होऊ शकतो. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार होऊ शकतो. अजूनही नेते आपापल्या मुलांना प्रमोट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत बीकेसी मैदानात पंतप्रधानांची सभा घेतली जाणार आहे. त्याच्या तयारीचा बावनकुळे यांनी आढावा घेतला.