मुंबईः कर्नाटकातील भाजपच्या पराभवावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (NCP President Sharad Pawar) महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा असल्याचे वातावरण असल्याचे सांगितले. पुढच्या निवडणुकीत ते देणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, आम्ही तिघे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ते घडताना दिसते आहे. आम्हाला असं वाटतं की तिघांनी एकत्र यावे. छोट्या पक्षांनाही विश्वासात घेण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. पण बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलूनच त्यांचा निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले.
लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार असून मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असल्याचे पवार यांनी सांगितले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र बसून पुढची आखणी आत्तापासूनच करावी, हा माझा विचार आहे. त्यानुसार मी इतर दोघांशी बोलणार आहे. त्यानुसार या मार्गाने जायचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असे पवारांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकमध्ये सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले, आम्ही समितीच्या विरोधात कुठेही उमेदवार उभा केला नाही. आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही. कारण समितीला महाराष्ट्राने विश्वास दिला होता. पण यावेळी एकीकरण समिती आणि अन्य पक्षांमध्ये एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे पवार म्हणाले.
कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. पण कर्नाटकच्या जनतेनेच असा निकाल दिलाय की फोडाफोडीला संधी मिळणार नाही, याची खबरदारी जनतेनंच घेतली आहे, असे पवार म्हणाले.