कोळसा खाण क्षेत्रातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणा – हंसराज अहीर

0

 

चंद्रपूर/यवतमाळ – वेकोलि नागपूर मुख्यालयाच्या अधिनस्त असलेल्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कोळसा खाणींमध्ये वाढती गुन्हेगारी, कोळसा चोरी, तस्करी व अनेक गैरप्रकार सुरु असल्याने या प्रकारावर तातडीने अंकुश घालावा, याप्रकरणी सखोल चौकशी करावी. सदर प्रकार रोकण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे तसेच खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या व प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेशी चर्चेदरम्यान केली.
नागपूर येथील होटल ब्ल्यू रेडीसन येथे दि 13 मे रोजी हंसराज अहीर यांनी कोळसा राज्यमंत्री दानवे यांची भेट घेवून त्यांचेशी वेकोलिशी निगडीत अनेक ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी वेकोलि मुख्यालयाचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोजकुमार यांची उपस्थिती होती. या भेटी मध्ये नागपूर वेकोलि मुख्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील बल्हारशाह, माजरी व अन्य कोळसा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या मालिकेत वृध्दी झाल्याच्या बाबींकडे अहीर यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधत हा प्रकार वेळीच सक्तीपूर्वक थांबविण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी या चर्चेत कोळशाची चोरी व अनेक गैरप्रकारांना उत आला असल्याने या प्रकारावर निर्बंध घालण्यासाठी ड्रोनद्वारे निगरानी करण्याबाबत प्राधान्याने निर्णय घेण्यात यावा असे सुचविले.
चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांशी संबंधित अपात्र विषयक प्रकरणे तसेच विविध प्रलंबित प्रकरणांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत तसेच अवैध प्रकार घडत असलेल्या क्षेत्राचा दौरा करुन परीस्थितीचे अवलोकन करण्याची विनंती अहीर यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना केली. या चर्चेत मंत्र्यांनी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले तसेच प्रकल्पग्रस्तांचे रेंगाळत असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना केल्या.