मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट, नागपुरात मुंबईच्या युवकाविरुद्ध गुन्हा

0

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्यात भादंविच्या (Mumbai Youth booked for twit against CM, DCM) कलम 354, 500, 504, 505, 507 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अन्वये हा गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव सार्थक कपाडी असे आहे. तो मुंबईतील ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती असून यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा दावा नागपूर भाजपकडून करण्यात आलाय. 19 फेब्रुवारी रोजी हे आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे.
मुंबईतील सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचे आढळून आले. नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर आमदार कृष्णा खोपडे यांनी रविवारी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर रात्री उशिरा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. नागपूर पोलिस सार्थक कपाडीला अटक करणार असल्याची माहिती आहे.
सार्थक कपाडी याने आपल्या ट्विटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलाय. सायबर पोलिसांकडून त्याची माहिती घेतली जात आहे. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने ते ट्विट पाहिल्यावर आमदार खोपडे यांना याबाबत माहिती दिली. यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा